Health | Jamun सिझन सुरु, आरोग्यासाठी जांबळाचे अनेक फायदे जाणून घेऊयात.

 


आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक सिझनल फळ (Fruit) मध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून उन्हाळ्यातील आंब्याचे सिझन संपत आले की, करवंद आणी जांबळाचे सिझन सुरू होते. आपल्याकडे रानावनात मिळणाऱ्या फळांना रानमेवा असेही म्हणतात.

आज जाणून घेऊया खास जांभूळ फळाचे अनेक फायदे. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव मसायझिजियम क्‍युमिनीफ असे आहे. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड-तुरट असते.

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते, तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो.

जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडया प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाच्या कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे.

जांभळाच्या बियांमध्ये ग्लुकोसाईड जांबोलिन हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.
जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.

पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे..
यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 7-8 जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर 15 मिनिटे उकळावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात 3-4 वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.

गर्भाशयाच्या बीजकेशांना सूज आल्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व निर्माण होते. अशा वेळी हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी जांभूळ बी 100 ग्रॅम, मंजिष्ठा 50 ग्रॅम, कारले बी 59 ग्रॅम, अशोका चूर्ण 50 ग्रॅम व सारिवा 50 ग्रॅम या सर्वाचे चूर्ण एकत्र करून सकाळी 1 चमचा व रात्री 1 चमचा घ्यावे. यामुळे बीजांडकोषाची सूज (पी.सी.ओ.डी.) हा आजार आटोक्‍यात येतो.
जांभळाचे बी व साल ही मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी 150 ग्रॅम, हळद 50 ग्रॅम, आवळा 50 ग्रॅम, मिरे 50 ग्रॅम कडुलिंबाची पाने 50 ग्रॅम, व कारल्याच्या बिया. यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेणे. यामुळे मधुमेह हा आजार आटोक्‍यात आणण्यास मदत होते.

पोटात येणारा मुरडा व अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात.

स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्‍वेतप्रदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभनकार्य करीत असल्याने या आजारावरगुणकारी आहे.

एखाद्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत असेल तर त्या स्त्रीला जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस द्यावा. यामुळे जीवनसत्त्व ई मिळते व त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स निर्मितीला चालना मिळाल्यामुळे व स्तंभनकार्यामुळे गर्भपात रोखला जातो.

दात व हिरडया कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढयाने गुळण्या कराव्यात.

मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.
चरकाचार्यानी यकृतवृद्धी या आजारावर जांभळे अवश्‍य खावीत. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक आम्ल रसामुळे यकृताचे कार्य व्यवस्थित चालते.

गर्भावस्थेत जांभळे भरपूर खावीत वा त्याचे सरबत प्यावे. यामध्ये लोह, कॅल्शिअम, क आणि ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ चांगली होते.

आम्लपित्त अरुची हे विकार झाले असतील तर जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून एका भांडयामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व 4-5 दिवस उन्हात ठेवावे, त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ 2 चमचे घ्यावा याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत.

जांभळाच्या सुकलेल्या बियांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, जांभळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व असतात. सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार केला जात असे. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा
उपयोग होतो.

जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनवेळा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे.

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब कमी होतो.

पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून 3-4 वेळा घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका