देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारनं सुरु केलेलं ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे. नागरिकांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांमध्ये तिरंगा फडकवावा अथवा दर्शनी भागात लावावा असं त्यांनी एका ट्विट संदेशात आज म्हटलं आहे. या अभियानामुळे आपल्या तिरंग्याविषयी सर्वांच्या मनात जिव्हाळा निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे.
२२ जुलै या दिवसाचं आपल्या देशाच्या इतिहासात खूप महत्व असून याच दिवशी आपण तिरंगा झेंड्याचा अधिकृतपणे स्वीकार केला होता असं त्यांनी म्हटलं आहे. याच संदेशात त्यांनी पंडित नेहरू तिरंगा फडकावतानाची एक चित्रफीत ,तसचं राष्ट्रीय ध्वज समितीच्या इतिहासातील काही माहिती देखील सामायिक केली आहे.
ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आणि स्वतंत्र भारताचा झेंडा फडकविण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व स्वातंत्र्य योध्यांचं धैर्य पुन्हा एकदा मनात जागवण्याची आज गरज आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही एका ट्विट संदेशाद्वारे हर घर तिरंगा या अभियानात सामील होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. प्रत्येक नागरिकांसाठी तिरंगा हा अभिमानाचा विषय आहे, खरा भारतीय नागरिक कसा असतो हे जगाला दाखवून द्या असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.