महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील भीष्म पितामह माजी आमदार आदरणीय गणपतरावजी देशमुख यांचे आज ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आदरणीय गणपत आबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
आदरणीय देशमुख साहेबांची आबा या नावानं खास ओळख होती. फायलींचं बंडल जवळ घेऊन आबा नेहमी विधिमंडळ आवारात दिसायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कधी विधिमंडळ कामकाज चुकवल नाही ‘विधिमंडळाचे विद्यापीठ’ असंही काही लोक त्यांना संबोधायचे, यात काही खोटं नसावंच. कारण दिग्गज नेतेमंडळी काहीही जुना संदर्भ हवा असेल तर आबांकडे जायचे आणि आबाही तेवढ्याच आपुलकीने एखादी गोष्ट समजून सांगायचे.
विधिमंडळाच्या कामकाजातही एखाद्या विषयावर खल सुरू असेल किंवा वादाचा विषय असेल तर बोलण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी सदस्य मंडळी गोंधळ करायचे. मात्र, अशावेळी कितीही गोंधळ सुरू असला आणि आबा बोलायला उभे राहिले की सभागृह शांत होऊन त्यांचं ऐकायचं. आबा उभे राहताच दोन्हीकडील मंडळी ‘आबांना बोलू द्या’ असं म्हणत शांत राहायची. अगदी शांतपणे आबा आपला मुद्दा मांडायचे, चर्चा करायचे. आबांच्या एवढा असा रिस्पेक्ट कदाचितच कुणाला मिळत असेल.
1962 ला आबांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली. सुरूवातीपासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष हाच त्यांचा श्वास. शेकापचा गढ आबांनी कित्येक वर्षे अबाधित ठेवला. आबा मंत्रीही झाले. मात्र, त्यांचा साधेपणा कायम अबाधित राहिला. कित्येकदा आबांच्या ‘एसटीने प्रवासाच्या’ बातम्या यायच्या. आता एसटी महामंडळाने आमदारांसाठी राखीव सीट रद्द केले तरी हरकत नाही. कारण एसटीने प्रवास करणारा आमदार गेलाय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज साधा नगरसेवक मनुष्य असला तरी तो कित्येक पिढ्यांची माया उभारून ठेवतो किंवा त्यांचं सामाजिक वावरणं पाहिल्यावर डोळे अचंबित होतात. मात्र, 50 हुन अधिक वर्ष आमदार राहिलेले आबा आपला साधेपणा आपल्या सोबतच घेऊन गेले.
अधिवेशनात आबांच्या विधिमंडळातील 50 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष प्रस्ताव आणला होता. देशामध्ये सर्वाधिक वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड करणारे गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब हे सर्व सदस्यांसाठी आदराचे आणि प्रेरणेचे स्रोत होते. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमीच त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली. 51 वर्ष विरोधी पक्षात काम करून एक अनोखी चळवळ त्यांनी उभी केली. शेतीप्रश्न आणि पाणीप्रश्न असला की त्यांच्याकडून कित्येकदा माहितीचा खजिना मिळतो. त्यांच्याकडून खूप सदस्यांना शिकायला मिळाले असून सुवर्णअक्षरांनी लिहावी अशी त्यांची कारकीर्द आहे.