छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू

छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू

तुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची हत्या करण्यात आली व याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. गावात दोघांना अग्नी देण्यात आला. अशा या घटनाक्रमामुळे दोन्ही गावांत शंभूराजे आणि कवी कलश यांची स्मृतिस्थळं पाहायला मिळतात. फाल्गुन वद्य अमावस्या फाल्गुन वद्य अमावस्या, ११ मार्च १६८९ साली म्हणजेच हिंदू नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याचा आदला दिवस. याच काळ्याकुट्ट दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंची निर्घृण हत्या औरंगजेबाने केली.

स्वराज्याचा रक्षणकर्ता, संस्कृत ग्रंथाचा निर्माता, एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच शत्रूंशी साडेआठ वर्षे झुंजणारा शूर सेनानी, कारकिर्दीत एक इंचही जमीन शत्रूस जिंकू न देणारा आणि स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारा सह्याद्रीचा छावा म्हणजेच संभाजीराजेंचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘बलिदान दिवस’ म्हणून पाळला जातो. या महाराष्ट्राच्या मातीने विजयाचे आणि आनंदाचे क्षण जसे अनुभवले तसेच दु:खाचा डोंगराएवढा आवेगही अनुभवला. झळाळणा-या गड-कोटींनी जसे युद्धविजयाचे मंत्रमुग्ध दिवस पाहिले तसाच भयाण काळाकुट्ट दिवसही अनुभवला.

हेच ते ठिकाण पहा व्हिडीओ तुळापूर आणि वढू संपूर्ण परिसर

महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंची झालेली हत्या हाही असाच एक भयाण आणि काळाकुट्ट दिवस. महाराष्ट्राच्या इतका दुर्दैवी अंत कुठल्याही वीरपुरुषाला आला नाही; परंतु शंभूराजेंना असा करूण अंत मिळाला. एका तेजस्वी अखेर इतक्या निर्घृणपणे व्हावी यासारखं दुर्दैव नाही. महाराष्ट्राचे मोठे अभाग्य म्हणायचे..

फाल्गुन वद्य अमावस्या, ११ मार्च १६८९ साली महाराष्ट्रातल्या दोन गावांनी शंभूराजेंचा हृदय पिळवटून टाकणारा अंत पाहिला. ती गावे होती तुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची हत्या करण्यात आली व याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. गावात दोघांना अग्नी देण्यात आला. अशा या घटनाक्रमामुळे दोन्ही गावांत शंभूराजे आणि कवी कलश यांची स्मृतिस्थळं पाहायला मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजेंनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यकारभाराची संपूर्ण धुरा स्वत:कडे घेतली होती. रणधुरंधर असलेल्या शंभूराजेंनी औरंगजेबाला अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. या कालावधीत औरंगजेबाला एक किल्लाही जिंकता आला नाही. याचाच राग येऊन औरंगजेबाने डोक्यावरील मुकुट न घालण्याची प्रतिज्ञाच केली होती. त्यामुळेच शंभूराजेंच्या अशा या हत्येने औरंगजेबाला वाटले की, आता स्वराज्य सहजपणे जिंकता येईल. पण झाले मात्र उलटेच. शंभूराजेंच्या या हौतात्म्याने संपूर्ण महाराष्ट्रच पेटून उठला. शंभूराजेंच्या शरीरातून पडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो शंभूराजे मावळ्यांच्या अंगात संचारले आणि औरंगजेबाला आणखी जेरीस आणले. त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यावर कधीही विजय मिळवता आला नाही. परंतु याच मातीने औरंगजेबाचा अंत मात्र पाहिला.

पराक्रमी शंभूराजेंच्या आयुष्याचा करूण अंत ज्या ठिकाणी घडला, ती ठिकाणे आज सर्व तरुणांसाठी शक्तिस्थळे आणि स्फूर्तीस्थळे बनली आहेत, यात शंकाच नाही. त्यामुळे हा इतिहास घडला कसा त्याचा मागोवा घेणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते. मुघल बादशहा औरंगजेबाने शंभूराजेंना आणि कवी कलश यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे करून नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे आणण्यात आले. या गडात औरंगजेबाने दोघांचा प्रचंड छळ केला. त्यानंतर दोघांना तुळापूर येथे आणून त्यांची हत्या केली. ज्या तुळापूर नगरीत हा दुर्दैवी प्रसंग घडला, त्या तुळापूरचा इतिहास देखील तेजस्वी आहे. कारण येथेच तीन नद्यांचा संगम होतो. भीमा-भामा-इंद्रायणी! या त्रिवेणी संगमावरच संगमेश्वर नावाचे भगवान शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून याचा जीर्णोद्धार आदिलशहाचा वजीर मुरार जगदेव याने केल्याचे सांगितले जाते. आजही हे सुंदर मंदिर पाहावयास मिळते.

याशिवाय याच संगमावर शहाजीराजांनी हत्तीच्या कानाएवढी सोन्याची तुला केली. म्हणजेच एका नौकेत हत्तीचे पिल्लू उभे करून नौका किती पाण्यात बुडाली याची खूण नौकेवर केली. त्यानंतर हत्तीला उतरवून नौकेत त्या रेषेपर्यंत सोने चढवून तुला केली. अशी अभूतपूर्व तुला केल्याने या नगरांचे नाव तुळापूर झाल्याचे सांगितले जाते. या आगळ्यावेगळ्या तुलेचे शिवाजी महाराज देखील साक्षी होते.

तुळापूरपासून वढू हे अंतर तसे फार नाही. अर्ध्या तासात गाडीरस्त्याने जाता येते. ही दोन्ही गावे एकाच नदीच्या काठावर वसली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गावांनी शंभूस्मारकाचं केलेलं जतन हे जास्त कौतुकास्पद आहे. तुळापूरला संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा उभारून तिथे एक स्मृती वृंदावन उभं केलं आहे. या तुळापूरच्या स्मृतिस्थळावर उभं राहिलो की, समोरील संगमाचे दृश्य डोळ्यांचे पारणेच फेडते. याच संगमाच्या पाठीकडे औरंगजेबाने शंभू महादेवाचं उद्ध्वस्त केलेलं मंदिर दिसतं. या सा-या परिसरातच मुघल छावणी पडली होती.

काही जण असेही म्हणतात की, या छावणीचा पसाराही मोठा असायचा. म्हणजे एक टोक तुळापूर व दुसरे टोक वढू येथे. तुळापूरच्या स्मृतिस्थळाभोवती तुळेपासून जीर्णोद्धारापर्यंतचा आणि शंभूराजेंच्या हत्येचा सारा घटनाक्रमच चित्ररूपाने मांडलेला दिसून येतो. वढू या गावीसुद्धा संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. या पुतळ्याशेजारीच कवी कलश आणि शंभूराजेंची स्मारके उभी आहेत. अतिशय उत्तम निगराणीत असलेली ही स्मारके पाहताना मन अगदी भरून येते. कारण अशा स्मारकांच्या ठिकाणी येऊन आपण कृतज्ञता व्यक्त करीत असतो.

ज्या वीरपुरुषांनी धर्माचे रक्षण करताना स्वत:च्या प्राणांची आहुती दिली त्या ठिकाणी आपली भावना ही आनंदाची नसावी. केवळ कृतज्ञतेची असावी याचे भान हे प्रत्येकाने राखले पाहिजे. कारण वढू आणि तुळापूर ही ठिकाणे पर्यटनस्थळे नसून आपल्यासारख्यांसाठी शक्तिस्थळे आणि स्फूर्तिस्थळे बनली आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका