जिल्ह्यात 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर कालावधीत विशेष मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 12 :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत प्रलंबित आधार प्रमाणिकरण तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तक्रारीच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आधार प्रमाणिकरण शिल्लक असलेल्या 5 हजार 843 शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत जवळच्या सेतू सुविधा क्रेंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.
शासन निर्णय 27 डिसेंबर 2019 नुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना- 2019 ही सुरु करण्यात आलेली आहे. या कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2 लाख 9 हजार 99 शेतकऱ्यांची माहिती बँकेने कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. त्यापैकी शासनाने विशिष्ट क्रमांकासह 1 लाख 95 हजार 583 शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. या प्रसिद्ध केलेल्या याद्यापैकी 1 लाख 89 हजार 740 शेतकऱ्यांनी 12 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणिकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणिकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यानी आधार प्रमाणिकरणासोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारीच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड तसेच आपले बँक शाखेशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. बारहाते यांनी केले आहे.