सावित्रीबाईंचा जन्म : क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथील तह. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी. माई त्यांचे पहिले अपत्य. सावित्रीबाईंना तीन भावंडं होती. सन १८४० मध्ये विवाहाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय अवघे नऊ वर्षे होते. त्यांचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसिंगीचे क्षीरसागर. त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षिस मिळाली म्हणून ते पुण्याला स्थायिक झाले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
मुलींची प्रथम शाळा : १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना त्यात सहा मुलींना प्रवेश दिला. सावित्रीबाईंनी १५ मे १८४८ ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढून १ मे १८४९ रोजी पुणे येथील उस्मान शेख वाड्यात प्रौढांसाठी शाळा काढली. या कृत्यामुळे सनातन्यांकडून त्रास होत असतानाही त्यांनी शैक्षणिक कार्य सोडले नाही. हे लक्षात आल्यामुळे सनातन्यांनी धोंडीकुमार, रामोजी रोड नावाचे भाडोत्री मारेकरी पाठविले. मात्र, त्याचा परिणाम उलट झाला. त्यातील धोंडीकुमार महात्मा फुलेंच्या प्रेर+णेने पंडित झाला. त्याचे वेदाधारी पुस्तक गाजले तर रामुजी रोडे हा भक्षकच फुलेंचा रक्षक झाला. अशा प्रकारे शुद्र व अतिशुद्रांना शिक्षण देत असल्याच्या कारणाने इंग्रज अधिकाऱ्यांकडून फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्यासाठी सन्मान करण्यात आला.
पहिल्या मुख्याध्यापिका : महात्मा फुले हे शेतात काम करताना फावल्या वेळात आंब्याच्या झाडाखाली त्यांची विधवा मावस बहिण सगुणाबाई क्षीरसागर व सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत असत. त्यानंतर मिसेस मिशेल यांनी सगुणाबाई व माईंची परीक्षा घेऊन त्यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये १८४६-१८४७ मध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला. या दोघींनी १८४६-४७ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रशिक्षित शिक्षिका व मुख्याध्यापक बनविले. सावित्रीबाई फुले मुलींना शिकविण्यासाठी जात असताना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी वेळोवेळी होणारा अपमान सहन केला नाही तर लोकांनी फेकलेल्या दगडांचाही सामना केला. त्रास होत असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थानाचे कार्य सुरू ठेवले.
विधवा पुनर्विवाहासाठी संघर्ष : महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि १८५४ मध्ये विधवांसाठी आश्रम बांधला. नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला. तसेच सती प्रथा रोखण्यासाठी, पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरी ठेवले. नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले. तो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला.
दलित उत्थानात योगदान : सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या जीवनकाळात पुण्यातच १८ महिला शाळा उघडल्या. १८५४ मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई यांनी अनाथाश्रम उघडले. एक व्यक्तीने भारतात सुरू केलेले हे पहिले अनाथाश्रम होते. अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधकगृह उभारले. जोतिबा यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे जोतिबा अध्यक्ष होते आणि सावित्रीबाई महिला विभागाच्या प्रमुख होत्या. शुद्रांना उच्च जातीच्या शोषणापासून मुक्त करण्याचे त्यांचे ध्येय होते. जोतिबांच्या या कार्यात सावित्रीबाईंनी मोलाचे योगदान दिले. १८५४ साली सावित्रीबाई फुले यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात ४१ पैकी १२ कविता मोडी लिपीत आहेत. यामुळे त्यांना आधुनिक कवितेच्या जनक म्हणता येईल. महात्मा फुलेंनी आपल्या घरातील हौद १८६८ साली अस्पृश्यांसाठी खुला केला. सन १८७६ मध्ये भीषण दुष्काळ पडला असताना सावित्रीबाईंनी मैत्रिणीच्या मदतीने वर्गणी जमा करून १८७७ मध्ये पुणे जिल्हयातील धनकवडी येथे बालाश्रम उभारले व तिथे दररोज हजार मुलांच्या जेवणाची सोय केली.
प्लेगची साथ : सन १८९७ मध्ये पुणे व परिसरात प्लेगची साथ पसरल्यावर सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ ससाणे यांच्या माळयावर दवाखाना सुरू केला. रुग्णांसाठी हॉस्पिटल काढून डॉ. यशवंत यांना रुग्णांची सेवा करायला सांगितले. प्लेगचा रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड याला पाठीवर घेऊन जात असताना त्यांना प्लेगचे संसर्ग झाल्याने १० मार्च १८९७ रोजी रात्री ९:०० वाजता वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. १९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. म्हाडा कॉलनी, सुगतनगर, नागपूर. मो. नं. ८३०८९६४१६. (लेखिका इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात कार्यरत आहेत)