महाराजा सयाजीराव यांच्या अलौकिक कार्याचा परिचय

महाराजा सयाजीराव यांच्या अलौकिक कार्याचा परिचय सहजपणे लोकांना व्हावा या प्रामाणिक भूमिकेतून ‘सयाजी ज्ञानमाले’ची ई-बुक मालिका मोफत स्वरुपात महाराष्ट्राला सादर करत असताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. 

 महाराजा सयाजीराव गायकवाड हे फक्त आधुनिक भारतातील सगळ्यात प्रागतीक राजे होते असे नाही तर भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाचे ‘बौद्धिक नेतृत्व’च ते करत होते. धर्म, जात, तत्वज्ञान, शिक्षण, संशोधन, शेती, उद्योग, आरोग्य, क्रीडा, साहित्य, संस्कृती, प्राच्यविद्या, पुरातत्व, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वातंत्र्यलढा इ. मानवी समाजाच्या सर्व अंगांना कवेत घेणार्‍या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले मानदंड आजही भारतासाठी आदर्श आहेत. त्यामुळे ते आधुनिक भारताचे निर्माते आणि खरेखुरे ‘महानायक’सुद्धा आहेत. 

 महापुरुषांचे चिंतन हे फक्त इतिहासाच्या स्वप्नरंजनासाठी किंवा इतिहासाचा पोकळ अभिमान बाळगण्यासाठी करायचे नसते. आपल्या समकालीन जगण्यातील समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी, आपला जीवनसंघर्ष सकारात्मक करण्यासाठीसुद्धा या महापुरुषांचे पुनर्वाचन आवश्यक असते. इतिहास जितका वस्तुनिष्ठपणे आपण वर्तमानाशी जोडू तितका समाजाचा भविष्यवेध आपल्याला अचूकपणे घेता येईल. 

 सयाजीरावांचा ‘उदोउदो’ करण्यासाठी सयाजी ज्ञानमालेची निर्मिती केलेली नाही. आजच्या आपल्या धार्मिक आणि जातीय संघर्षावर, शेती-उद्योगातील संकटांवर मात करण्यासाठी तसेच समाज म्हणून आपल्यातील ‘विसंवाद’ कमी करून ‘सुसंवाद’ वाढवण्याच्या व्यापक भूमिकेतून ही ज्ञानमाला आकाराला आली. या निमित्ताने आपला सुटलेला इतिहास ‘जोडून’ वाचण्याची आणि त्यातून संवादाचे पूल उभारण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल एवढे मात्र नक्की.

 या सयाजी ज्ञानमालेत पहिल्या टप्प्यात ६० ई-बुक्स तयार झाली आहेत. तर अजून ५० ई-बुक्स तयार करण्याचे काम सुरु आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येतील. या मालेत एकूण ११० ई-बुक्स तयार होत असून ती छापील स्वरूपातही लवकरच उपलब्ध होतील. 

 आज गुरुवार दिनांक ८ जुलैपासून एक दिवसआड सलग स्वरुपात ही ई-बुक्स आम्ही आपणांस मोफत पाठवणार आहोत. ती आपणही वाचाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम राष्ट्रीय भावनेतून कराल याची खात्री आहे.  

दिनेश पाटील  (संपादक)

बाबा भांड (सचिव)                                     

महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका