मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त जिल्ह्यात 75 हजार व्यक्तींना कोविड लसीकरणाचा संकल्प – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर |
नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व यामूळे गत दिड वर्षात बाधितांना सोसावे लागणारे कष्ट लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे अवघ्या जगाच्या लक्षात आले आहे. जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकाराचे आवाहन केले आहे. आरोग्य विभाग, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 75,000 people in the district will be vaccinated on the occasion of Marathwada Liberation Day. Collector Vipin Itankar
जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले असून महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाना यापूर्वीच समन्वय साधून ठिकठिकाणी लसीकरण शिबिराचे ही आयोजन केले गेले आहे. महानगरपालिका पातळीवर सर्व वार्डनिहाय सुक्ष्म नियोजन करुन 17 सप्टेंबर रोजी 10 हजार, शहरी कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील इतर शासकीय रुग्णालय याठिकाणी 32 हजार डोस लसीकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील 68 प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत किमान 750 लसीकरण या सुत्रानुसार 51 हजार डोस लसीकरणाची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सदर व्यापक लसीकरणाचा संकल्प जाहिर करण्यात आला असून जिल्ह्यातील विविध संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतीसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 75,000 people in the district will be vaccinated on the occasion of Marathwada Liberation Day. Collector Vipin Itankar