अनिल देशमुख यांच्या राजीनामा नंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया मध्ये देवेंद्रच्या विरोधी बाकावरील यशस्वी लढाचे परिणाम म्हणून आघाडीच्या मंत्र्यांच्या राजीनामा कडे बघितलं जातय. आणी आता पुढची विकेट पडणार म्हणून भाजप महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, पक्ष प्रवक्ते यांच्या कडून अशी विधान केली जात आहेत तर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पोटक वक्तव्य केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी 100 कोटीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जाणार असल्याने गृहमंत्रीपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत राजीनामा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,” अशी स्फोटक प्रतिक्रिया औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या यांनी परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. सोमय्या यांच्या आजच्या स्फोटक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.