कृषि प्रक्रिया, कृषि मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषि मालाची विक्री व्यवस्था निर्मिती करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

Online Team  : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मुल्यसाखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषि प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले. कृषि हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसीत करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषि प्रक्रिया, कृषि मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषि मालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, कृषि संचालक सुभाष नागरे, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प, मा.बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषि परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, गट शेती योजना यासारख्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे श्री. भुसे यांनी सांगितले.


अस्तित्वात असलेल्या कृषि प्रक्रिया सुविधांचे मॅपिंग करून त्यात भर टाकण्यासाठी व उणीवा दूर करण्यासाठी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमांतून अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. कृषि प्रक्रिया उद्योगाबाबत कौशल्य असलेल्या तज्‍ज्ञांच्या सेवेचा वापर करून मुल्यसाखळी विकसीत करतांना समन्वय ठेवावा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.


कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादन निहाय मानके निश्चित करावी. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे लक्षात घेऊन या भागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी व याकरीता विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी. महाराष्ट्र कृषि उद्योग महामंडळ व कृषि विद्यापीठे यांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देऊन कृषि प्रक्रिया, कृषि मुल्यसाखळी बळकटीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे श्री. भुसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका