कवडीमोलाचं जीणं… महादेव घुंगरड

         “बाप्पू , तेवढा दीडदोन कुंटल कापूस चांगला भाव आल्यावर व्यापार्याला घालून ,पैसे आम्ही येईपर्यंत तुमच्या कडे ठेवा.”
          माझ्या सर्वात मोठ्या चुलत भावाची सुन‌, उसतोडीला नेणार्या गाड्या आल्या तसा निरोप घेत , माझ्या पायावर डोकं टेकवून अगतिकतेनं म्हणाली..

         “यंदा ऊसतोडीला जायचं नव्हतं ; पण दुष्काळामुळं‌ इथं भागणार नाही ! तेवढं दिदीकड लक्ष ठेवा मोठी झालीय ती !” मी हो म्हणालो , तिनं न सांगता ही ते केलं असतंच ; त्यात विशेष काही नाही ! ऊसतोड हे आम्हा बीडवासीयांचं प्राक्तन ! दुर्दैवी आणि सुदैवीही ! या अमानूष वाटणार्या कामाने आमचे अनेकांची विझती चुल पेटती ठेवण्याचं मोठं काम केलंय . दहा-दहा वर्षे ऊसतोड मजूरी करून अनेकांनी संसार मार्गी लावले , कोरडवाहू किंवा तुटपुंज्या बागायती जमिनी,त्यातून येणारं अपूरं उत्पन्न,अतिवृष्टीत वाहून जाणारं पीक अन् अनावृष्टीनं व्याकून माना टाकणारं धान….उपासमार ,बरबडा ,कुर्डू,पाला ,पाचोळा ,प्रसंगी  माती खावून १९७२ चा दुष्काळ पार केलेली आमची आधीची पिढी ; जगण्यासाठी इतर कोणतंही साधन नसल्याने या दुष्काळापासून ऊसतोड करणे हेच आमचे काम झाले आहे.जिकिरीचे,दमवणारे, ”माणूस”पणाला सर्वांर्थाने आणि सर्वांगाला सतत जोखत राहणारे काम !आमच्या जगण्यासाठीचा कोयत्याच्या धारेवर पाय रोवून ,ठामपणे उभा असलेला रक्ताळलेला आधारवड !
       १९७२ ला मोठा दुष्काळ पडून ,सर्वांची झालेली अन्नान्न दशा . मोठ्यांकडून ऐकलेल्या भाकरीच्या असंख्य गोष्टी …. माणसाच्या माणूस पणाला चुरगाळून भिरकावलेल्या ! लाचार,हतबल,दुबळ्या , आब,मान-मरातब पोटात घेतलेला १९७२ चा अन्नाचा दुष्काळ…
      २०१८ चा हा दुष्काळ अन्नाचा नाही ! अन्न विपूल‌ आहे..  ७२च्या दुष्काळाच्या रट्ट्यातून धडा घेत आपण अन्नटंचाईवर कायमची मात केली आहे.. अन्नासाठी काम योजनेन्वये जायकवाडी सारखे काही प्रचंड मोठे ; तर आपल्या गावातील तलावांसारखे अनेक मध्यम वापर छोटे तलाव बांधले गेले !
       १९७२ ला सिंचनाची सोयी नव्हत्या ,सगळी शेती पावसावर ,पावसाअभावी अन्न पिकले नाही ; तरीही उपसा नसल्याने ,पिण्याच्या पाण्याची टंचाई नव्हती !
अन्नाचा दुष्काळ भविष्यातील पाण्यासाठी उपासपोटी कारणी लावला एका पिढीने ! सुधारित /संकरीत बियाणे आणि वाढत्या सिंचनसोयींनी धान्य पुरूण उरतेय, गोदाम भरून सडतेय ! दरम्यान या उण्या अर्धशतकाच्या काळात बेसुमार पाणी उपशामुळे भूजलपातळी भूगोलाच्या गाभ्याकडे सरकली..
         १९७२ ला अन्नाचा,आज २०१८ ला पाण्याचा दुष्काळ आहे ! आणखी तितक्याच कालावधीत कदाचित  पृथ्वीवर माणूस शिल्लक राहिल ? की नाही ? प्रश्न अप्रिय असला अप्रस्तुत म्हणता येणार नाही.
        शेती आणि शेतकरी हा खरं तर मानवाचा आदिम व्यवसाय ! मूलाधार !मानवी  सर्जनाचे सर्वांगसुंदर उदाहरण ज्याला अनुभवाचं आहे ,त्याने शेती बघावी ;आणि “तोंड दाबून बुक्क्याचा मार”काय असतो त् कोंडमारा,अगतिकता,पोरकेपणा आणि व्यवस्थेने नाकारलेलं जीणं‌ ज्याला अनुभवायचंय,त्याने एक-दोन वर्षे शेती करून पाहावी..शेतकरी पहावा..
        शेतीचा संबंध नसलेली दोन -तीन पिढ्यां पासून वा मुळचे शहरात राहत असलेले , अगदी नावावर शेती पण बापजाद्यांसह  कधीच मातीत हात घालायची गरज नसलेले महाभाग नरभक्षक वाघीन अन्वीच्या मरण्याने कासावीस होतात ! तिच्या बछड्यांचे काय होईल‌ या विचाराने हवालदिल होतात.मानवानेच जंगलावर, निसर्गावर आतिक्रमण केले असून , त्यामुळे बिबळे ,वाघांनी काही मुलं माणसं मारली तरी ते विशेष नाही…मरू द्या ,माणसं मेली तरी ! कारण वन्यजीवाच्या अधिवासाचा संकोच हा सम‌स्त मानवजातीनेच केला आहे ,म्हणून हे नरभक्षण पापक्षालन आहे,न्याय्य आहे ,असा दावा करत हे मनेका गांधीसारखे अप्पलपोटे ,हरामखोर ,ऐयाश आणि कृतघ्न शहरी रस्त्याच्या डाव्या बाजूला सुरक्षितपणे मेणबत्त्या पेटवत …या पापक्षालन यज्ञातील गरीब शेतकरी,आदिवाशींची आहुती न्याय्य ठरवत राहतात.. …..मरतांना नाडलेला शेतकरी ,आदिवासी,मरतो अन् या समिधा मानववंशाच्या नावे मोजण्याचा शहाजोगपणा करतांना प्रसारमाध्यमं,विद्वान,विचारवंत ,धनिकांना कसलीच लाज वाटत नाही …मुळात वंचीत,दुबळे आदिवासी,जीव नकोसा झालेले शेतकरी ,रोजची मिठभाकरीची लढाई लढणारे खेडूत हे शहरी ,धनिक,आणि अभिजनांसाठी माणूसपणाच्या गिणतीत येत नाही.उलट या लोकांचंही काही जगणं आहे …माणूसपणाच्या काही सवयी,जमेच्या,तर काही कमकुवत बाजू असू शकतात ,इतकंच नाही तर हिही आपल्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत हेच यांना मान्य नाही…
                शेतकरी,कष्टकरी आणि सामान्याचं’ आयुष्य’ हे यांच्या माणूसपणाच्या यादीत यायची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही…
            तोपर्यत आपली शिकार योग्य आणि अवनी सेलिब्रेटी ठरत राहणार !

महादेव रामभाऊ घुंगरड
२२-१२-२०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका